
नांदेड, १४ ऑगस्ट (हिं.स.) : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल गुरुवारी माता साहिब गुरुद्वारा परिसरात झालेल्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोराने धारदार खंजरने त्यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला; मात्र विशेष सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांच्या सतर्कतेमुळे हा हल्ला अयशस्वी ठरला.
केंद्रे यांनी वेळीच हस्तक्षेप करून बादल यांच्या छातीवर होणारा वार अडवला आणि हल्लेखोराला बाजूला ढकलले. या झटापटीत केंद्रे यांच्या हातालाही दुखापत झाली, तर सुखबीरसिंग बादल यांच्या उजव्या हाताला, कोपराच्या खाली खंजरचा वार लागला. मुदखेड पोलिसांनी केंद्रे यांचा लेखी जबाब घेतल्यानंतर या घटनेचे अधिक तपशील समोर आले.
हल्लेखोर पुण्याचा रहिवासी
हल्ल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव जसपालसिंग ऐधन असून तो पुण्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११८ (१), १२१ (२) तसेच शस्त्र अधिनियमातील संबंधित कलमांनुसार मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० ऑगस्टलाच मिळाली होती दौऱ्याची माहिती
केंद्रे यांच्या जबाबातून सुखबीरसिंग बादल आणि त्यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्या नांदेड दौऱ्याची माहितीही समोर आली आहे. बादल दाम्पत्याच्या दौऱ्याची माहिती मुंबईच्या राज्य गुप्तवार्ता विभागाकडून १० ऑगस्ट रोजी नांदेड पोलिसांना प्राप्त झाली होती. १२ ते १४ ऑगस्टदरम्यान बादल दाम्पत्य नांदेडमध्ये राहणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली होती.
बादल दाम्पत्याचे वास्तव्य शहरातील स्कायलाइट लॉडर्स हॉटेलमध्ये होते. हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रथम मालटेकडी आणि त्यानंतर हिराघाट गुरुद्वारात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा ताफा दुपारी पावणेदोनच्या सुमारास माता साहिब गुरुद्वारात दाखल झाला. यावेळी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
गर्दीचा फायदा घेत हल्ल्याचा प्रयत्न
माता साहिब गुरुद्वारात दर्शन आणि प्रार्थनेसाठी बादल यांनी सुमारे दहा मिनिटे घालवली. त्यानंतर ते गुरुद्वाराच्या पायऱ्या उतरत असताना त्यांच्या अवतीभोवती स्थानिक तसेच अन्य ठिकाणांहून आलेल्या शीख बांधवांची मोठी गर्दी झाली होती. काही जण बादल यांच्यासोबत छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करत होते.
याच गर्दीचा फायदा घेत निळ्या पेहरावातील एका इसमाने हातातील धारदार खंजरने बादल यांच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराचा वार अडवला आणि त्याला बाजूला ढकलले.
यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धावून आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने बादल यांना सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने वाहनातून यशोसाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हल्लेखोरासोबत झालेल्या झटापटीत केंद्रे यांच्या उजव्या हाताच्या तळहाताला आणि एका बोटाला दुखापत झाली. त्यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार करण्यात आले.
हरसिमरत कौर बादल यांनी मानले आभार
या घटनेत धाडस आणि कर्तव्यनिष्ठा दाखवणारे एसपीयूचे पोलीस निरीक्षक संतोष वैजनाथ केंद्रे यांचे बादल कुटुंबीयांनी कौतुक केले आहे. सुखबीरसिंग बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांनी यशोसाई रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या केंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेतली.
सुखबीरसिंग बादल यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केंद्रे यांनी दाखवलेले धाडस कर्तव्याला भीतीपेक्षा प्राधान्य देणारे असल्याचे सांगत बादल कुटुंबीयांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis