ठाणे - दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे १४ ठिकाणच्या कुटुंबांचे स्थलांतर करण्याची आ अॅड. माधवी नाईक यांची मागणी
ठाणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे महापालिका क्षेत्रात दरड कोसळण्याची भीती असलेल्या १४ ठिकाणच्या नागरिकांचे तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार अॅड. माधवी संजय नाईक यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याक
ठाणे


ठाणे, 14 ऑगस्ट (हिं.स.)। ठाणे महापालिका क्षेत्रात दरड कोसळण्याची भीती असलेल्या १४ ठिकाणच्या नागरिकांचे तात्पुरते सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार अॅड. माधवी संजय नाईक यांनी महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुंबईतील घाटकोपर येथे दरड कोसळल्यामुळे ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातही महापालिका प्रशासन व आपत्कालीन विभागाकडून सतर्कता बाळगण्याची गरज आहे. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, घोडबंदर रोड भागातील १४ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. मात्र, या भागातील रहिवाशी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना स्थलांतरासाठी मर्यादा येत आहेत, असे आमदार माधवी नाईक यांनी पत्रात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने शहरातील दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. तसेच या भागातील नागरिकांना तात्पुरता निवारा द्यावा, अशी मागणी अॅड. माधवी नाईक यांनी केली. तसेच कोणत्याही परिस्थितीत जीवितहानी होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande