

अमृतसर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। देशभराप्रमाणेच अमृतसरच्या अटारी-वाघा सीमेवरही ८०वा स्वातंत्र्यदिन संपूर्ण अभिमान, उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बीएसएफचे डीआयजी एस.एस. चंदेल प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. यावेळी सीमेवर तैनात जवान आणि अधिकाऱ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
डीआयजी एस.एस. चंदेल यांनी देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देताना सांगितले की, बीएसएफचे जवान देशाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र सीमेवर पूर्ण निष्ठा आणि समर्पणाने तैनात आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करणे ही बीएसएफसाठी अभिमानाची बाब आहे आणि जवान प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सदैव तयार असतात, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सीमेवर बीएसएफकडून बजावण्यात येत असलेल्या भूमिकेचा उल्लेख करताना सांगितले की, जवानांनी शत्रूच्या हालचालींचा खंबीरपणे सामना केला आहे. बीएसएफने ड्रोन पाडण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रेही जप्त केली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी सब-इन्स्पेक्टर पदावरून इन्स्पेक्टर पदावर पदोन्नती झालेल्या दोन बीएसएफ जवानांचा सत्कार करण्यात आला. डीआयजी यांनी सांगितले की, हा सन्मान जवानांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने डीआयजी एस.एस. चंदेल यांनी बीएसएफ जवानांना लाडू भरवून त्यांचे तोंड गोड केले. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी सीमेवरील वातावरण देशभक्तीने भारून गेले. कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. डीआयजी यांनी राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule