
रत्नागिरी, 15 ऑगस्ट (हिं.स.) । ८०व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी भारतीय जनता पार्टीतर्फे देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावणाऱ्या निवृत्त सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ ध्वजारोहण नाही, तर ज्यांनी रक्त सांडून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले त्या वीरांचे ऋण स्मरण करण्याचा दिवस आहे. या भावनेतून भाजपने दोन जवानांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त केली. सदानंद बाळकृष्ण सावंत आणि सुरेश सखाराम राणे या दोन निवृत्त सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात दोन्ही सैनिकांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगितले. सीमेवरील कठीण प्रसंग, देशभक्ती आणि कर्तव्याची जाणीव त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. भाजपाने केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सैनिकांच्या त्यागाला सलाम केला आणि सांगितले की, सैनिक सुरक्षित आहेत, तोपर्यंत देश सुरक्षित आहे. त्यांचा सन्मान ही आमची जबाबदारी आहे. या कार्यक्रमाच्या वेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे, शहर सरचिटणीस व नगरसेवक संदीप सुर्वे, शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, हर घर तिरंगा संयोजक संतोष सावंत आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी