
नांदेड, 15 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ८० वा वर्धापन दिन महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली, ध्वजारोहण संपन्न झाल्यावर मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगान व राज्यगीत गायले तसेच पोलीस दलाने व अग्निशमन दलाने झेंड्यास सलामी दिली. याप्रसंगी महापौरांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. नांदेड शहराचा सर्वांगीण विकास करणे, शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खऱ्या अर्थाने देशाची सेवा ठरेल, असे त्यांनी नमूद केले.तसेच मनपा आयुक्तांनी आपल्या संदेशात सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या या अमृतोत्तर सुवर्ण महोत्सवी टप्प्यावर पालिकेची संपूर्ण यंत्रणा नागरिकांना अधिक गतीने आणि पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी मनपाचे उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, सभागृह नेता महेश कनकदंडे, शिक्षण, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, उपभापती निरंजना लांडगे, गटनेता संदीपसिंग गाडीवाले, मसूद खान, तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis