
नवी दिल्ली, १५ ऑगस्ट (हिं.स.)स्वातंत्र्य दिनानिमित्त, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे नवीन मुख्यालय, इंदिरा भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खजिनदार अजय माकन आणि सेवा दलाचे मुख्य संघटक बी. व्ही. श्रीनिवास यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
आपल्या भाषणात खर्गे म्हणाले की, आजचा दिवस केवळ स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करण्याचा नाही, तर स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने कितपत पूर्ण झाली आहेत, यावर प्रश्न विचारण्याचाही आहे. काँग्रेस पक्षाचा १४१ वर्षांचा इतिहास आणि स्वातंत्र्य लढ्यातील त्याच्या भूमिकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तेतील बदल नव्हे, तर गरिबी, भेदभाव, बेरोजगारी आणि भीतीपासून मुक्ती होय. त्यांनी पंडित नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या योगदानावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेसने देशात आधुनिक संस्था, हक्क आणि विकासाचा पाया घातला.
खर्गे यांनी आरोप केला की, सध्याच्या सरकारने कोणतेही नवीन हक्क दिलेले नाहीत आणि केवळ नाव बदलण्याचे राजकारण केले आहे. आज तरुणांची स्वप्ने चिरडली जात आहेत आणि चुकीच्या धोरणांनी त्यांना आंदोलनाच्या मार्गावर ढकलले आहे. संविधान प्रत्येक नागरिकाला मतभेद आणि शांततापूर्ण आंदोलनाचा हक्क देते आणि काँग्रेस नेहमीच तरुण आणि गरिबांच्या पाठीशी उभी राहील.
काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, आज लोकशाही संस्था दबावाखाली आहेत, तज्ज्ञांना वैज्ञानिक संस्थांमधून राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे आणि सरकार एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना लादत आहे. त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर संसदेत प्रश्न टाळल्याचा आरोप केला. राम मंदिरातील अर्पणांच्या चोरीबाबत खर्गे म्हणाले की, भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्यांचे संरक्षण केले पाहिजे.
ते म्हणाले की, काँग्रेससाठी स्वातंत्र्याचा अर्थ प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि संधी मिळवून देणे आहे. खरा उत्सव तेव्हा साजरा होईल, जेव्हा प्रत्येक मूल शाळेत जाईल, प्रत्येकाला वैद्यकीय उपचार, रोजगार आणि न्याय मिळेल, जातीय भेदभाव संपुष्टात येईल आणि महिला मुख्य प्रवाहात येतील.
त्यानंतर राहुल गांधींनी लिहिले की, स्वातंत्र्य ही केवळ एक देणगी नसून एक जबाबदारी आहे. सत्य आणि अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करणे, संविधानाची आणि तिरंग्याची मूल्ये जपून ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीचे रक्षण करणे ही ही जबाबदारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे