लातूर वाहतूक पोलिसांना ऊन-पावसापासून संरक्षणासाठी ११ प्रमुख ठिकाणी ‘अम्ब्रेला शेल्टर’
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील वाढती वाहतूक आणि प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यासोबतच, भर उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुविधेकडेही लातूर पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. शहरात
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)।

लातूर शहरातील वाढती वाहतूक आणि प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यासोबतच, भर उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सुविधेकडेही लातूर पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. शहरातील ११ प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलिसांसाठी ‘अम्ब्रेला शेल्टर’ उभारण्यात आले आहेत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या ‘अम्ब्रेला शेल्टर’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

लातूर शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि मार्गांवर वाहतूक पोलिसांना दिवसभर रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियमन करावे लागते. उन्हाची तीव्रता, पावसाळ्यातील प्रतिकूल हवामान तसेच बदलत्या वातावरणाचा सामना करत वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कर्तव्य बजावले जाते.

या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांना उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळावे, तसेच प्रतिकूल हवामानातही त्यांना प्रभावीपणे वाहतूक नियंत्रण करता यावे, यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

११ प्रमुख ठिकाणी सुविधा

लातूर शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या एकूण ११ ठिकाणी ‘अम्ब्रेला शेल्टर’ बसविण्यात आले आहेत. या सुविधेमुळे वाहतूक पोलिसांना हवामानापासून संरक्षण मिळण्यासोबतच त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित आणि सोयीचे कामाचे वातावरण निर्माण होणार आहे.

शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच, वाहतूक नियंत्रणासारखे महत्त्वाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या मूलभूत सुविधांकडेही लातूर पोलीस दलाकडून लक्ष दिले जात आहे.

‘सुरक्षित वाहतूक’सोबतच ‘कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांची सुरक्षितता’ यालाही प्राधान्य देणारे हे पाऊल ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande