तरुणाईची दिशा ठरविणे हीच भारताच्या भविष्याची गुरुकिल्ली- मोहन भागवत
योग्य उपयोग न झाल्यास लोकसंख्यात्मक देणगी ठरू शकते ओझे नागपूर, १५ ऑगस्ट (हिं.स.) : भारताची तरुणाई ही देशासाठी मोठी लोकसंख्यात्मक देणगी आहे. या तरुण शक्तीला योग्य दिशा, संधी आणि संस्कार मिळाले, तर ती देशाच्या प्रगतीला नवी उंची देऊ शकते; मात्र त
डॉ मोहन भागवत, सरसंघचालक


योग्य उपयोग न झाल्यास लोकसंख्यात्मक देणगी ठरू शकते ओझे

नागपूर, १५ ऑगस्ट (हिं.स.) : भारताची तरुणाई ही देशासाठी मोठी लोकसंख्यात्मक देणगी आहे. या तरुण शक्तीला योग्य दिशा, संधी आणि संस्कार मिळाले, तर ती देशाच्या प्रगतीला नवी उंची देऊ शकते; मात्र तिच्या क्षमतेचा योग्य उपयोग झाला नाही, तर भविष्यात हीच लोकसंख्यात्मक देणगी समाजावर ओझे ठरू शकते, असा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी दिला. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गेल्या दहा दिवसांत जेन-झी तरुणांशी दुसऱ्यांदा संवाद साधताना भागवत यांनी तरुणांना केवळ वर्तमानाचा नव्हे, तर पुढील पिढ्यांचाही विचार करण्याचे आवाहन केले.

आजची तरुण पिढी सुमारे 30 वर्षांनंतर वृद्ध होणार आहे. त्यामुळे स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच भविष्यातील पिढ्यांच्या गरजा, त्यांचे जीवन आणि देशाचे भविष्य यांचाही विचार तरुणांनी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारताच्या विकासाचे निकष स्वतंत्र असावेत

भारताच्या विकासाची तुलना अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन किंवा न्यूझीलंडसारख्या देशांशी करून विकासाचे निकष निश्चित करणे योग्य नाही, असे भागवत यांनी स्पष्ट केले. भारताची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रचना आणि उपलब्ध संसाधने इतर देशांपेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे भारताच्या गरजा आणि परिस्थितीला अनुरूप स्वतंत्र विकासदृष्टी आणि धोरणे आखण्याची आवश्यकता आहे.

कॅनडा, अमेरिका किंवा चीन यांसारख्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळ अथवा संसाधनसाठा असलेल्या देशांची विकासपद्धती भारताला जशीच्या तशी लागू करता येणार नाही. भारतासमोरील समस्यांचा सखोल अभ्यास करून देशाच्या परिस्थितीनुसार त्यावर स्वतंत्र उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रमाला प्रतिष्ठा, तरुणांना उद्योजकतेची दिशा

भविष्यातील भारताची कमावती शक्ती तरुणच असतील, असे सांगताना भागवत यांनी रोजगाराची व्याख्या केवळ नोकरीपुरती मर्यादित नसल्याचे स्पष्ट केले. श्रम करणारे हातही देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी ताकद आहेत. त्यामुळे श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

तरुणांनी नोकरीच्या शोधापुरते मर्यादित न राहता उद्योजकतेकडे वळावे आणि अडचणींना धैर्याने सामोरे जात स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जगाचा दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात भौतिकवादी झाला असला, तरी भारताची जीवनदृष्टी केवळ पैसा कमावण्यापुरती मर्यादित नाही. भारताच्या मूल्यव्यवस्थेला आणि देशाच्या परिस्थितीला सुसंगत असा विकासाचा मार्ग निश्चित करणे गरजेचे आहे, असे भागवत यांनी सांगितले.

जगाला संतुलित विकासाची दिशा देण्याची गरज

भविष्यात भारताने जगाला मार्गदर्शन करण्याची आणि विकासामध्ये संतुलन निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यासाठी देशाने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात मोठा तिरंगा फडकविण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा संदर्भ देत भागवत यांनी राष्ट्रध्वजामागील भावना आणि भारताला अधिक उंचीवर नेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा विचार करण्याचे आवाहन केले.आपण भारत आहोत. भारताचा स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि विकासाची स्वतःची संकल्पना आहे,असा संदेश देताना त्यांनी प्रगतीचे निकषही भारताने स्वतःच्या परिस्थितीनुसार ठरविले पाहिजेत, असे सांगितले. इतर देशांशी तुलना करण्याऐवजी भारतासाठी आणि स्वतःसाठी नेमके काय आवश्यक आहे, याचा विचार करून पुढे जाणे हीच काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande