लातूरमार्गे धावणाऱ्या दोन विशेष रेल्वे आता नियमित एक्सप्रेस
लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लातूरमार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांचे रूपांतर नियमित एक्सप्रेस गाड्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूरसह धाराशिव, बार्शी, सोलापूर, पुणे आणि मुंबई
रेल्वे


लातूर, 15 ऑगस्ट (हिं.स.)। रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने लातूरमार्गे धावणाऱ्या दोन विशेष गाड्यांचे रूपांतर नियमित एक्सप्रेस गाड्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लातूरसह धाराशिव, बार्शी, सोलापूर, पुणे आणि मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष गाड्यांसाठी आकारले जाणारे अतिरिक्त भाडे बंद होऊन नियमित मेल/एक्सप्रेस तिकीट दर लागू होणार आहेत.

हडपसर–हरंगूळ (लातूर) आणि सोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन गाड्यांना नियमित एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.

हडपसर–हरंगूळ एक्सप्रेस १५ ऑगस्टपासून

हडपसर–हरंगूळ (लातूर) मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीचे नियमित एक्सप्रेसमध्ये रूपांतर १५ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे. यापूर्वी या गाडीचे क्रमांक ०१४८७ आणि ०१४८८ असे होते. आता या गाडीला नवीन क्रमांक देण्यात आले आहेत.

हडपसरहून हरंगूळकडे जाणाऱ्या गाडीचा नवीन क्रमांक ११४२९, तर हरंगूळहून हडपसरकडे जाणाऱ्या गाडीचा क्रमांक ११४३० असा असेल. विशेष गाडीऐवजी नियमित एक्सप्रेस म्हणून धावल्यामुळे प्रवाशांना स्पेशल भाड्याऐवजी नियमित प्रवासी भाडे द्यावे लागणार आहे.

सोलापूर–मुंबई एक्सप्रेस १८ ऑगस्टपासून

सोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर वाया बीदर आणि लातूर धावणाऱ्या विशेष गाडीचेही नियमित एक्सप्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. हा बदल १८ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे.

या गाडीचे जुने क्रमांक ०१४३५ आणि ०१४३६ असे होते. आता सोलापूरहून मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडीचा क्रमांक ११३०३, तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून सोलापूरकडे येणाऱ्या गाडीचा क्रमांक ११३०४ असा असेल. ही गाडी बीदर आणि लातूरमार्गे धावणार आहे.

प्रवाशांचा खर्च होणार कमी

विशेष रेल्वे गाड्यांना लागू असलेले अतिरिक्त विशेष भाडे आता या दोन्ही गाड्यांसाठी लागू राहणार नाही. त्याऐवजी नियमित एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे तिकीट दर आकारले जातील. त्यामुळे लातूर, धाराशिव, बार्शी, सोलापूर, पुणे आणि मुंबईदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

लातूरमधून पुणे आणि मुंबईकडे तसेच सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या महत्त्वाच्या आहेत. विशेष गाड्यांचे नियमित एक्सप्रेसमध्ये रूपांतर झाल्याने प्रवाशांना अधिक स्थिर आणि नियमित रेल्वे सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रवाशांमध्ये समाधान

लातूर परिसरातील रेल्वे प्रवाशांकडून गेल्या काही काळापासून नियमित रेल्वे सेवांची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन विशेष गाड्यांना नियमित एक्सप्रेसचा दर्जा मिळाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विशेष भाड्याचा अतिरिक्त आर्थिक भार कमी होऊन सामान्य एक्सप्रेस दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याने दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिकांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

१५ ऑगस्टपासून हडपसर–हरंगूळ आणि १८ ऑगस्टपासून सोलापूर–मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ही सेवा नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार असल्याने लातूरच्या रेल्वे प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande