रत्नागिरी : कोकण भूमीदिनाची घोषणा लवकरच करण्याचा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा निर्धार
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे लवकरच कोकण भूमीदिन घोषित करणार असल्याची घोषणा अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे. कोकण भूमिपुत्रांना कोकणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व समजावे, आपल्या हक
रत्नागिरी : कोकण भूमीदिनाची घोषणा लवकरच करण्याचा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचा निर्धार


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे लवकरच कोकण भूमीदिन घोषित करणार असल्याची घोषणा अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी केली आहे.

कोकण भूमिपुत्रांना कोकणचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व समजावे, आपल्या हक्कांविषयी आत्मभान निर्माण व्हावे आणि कोकणच्या भवितव्याबाबत स्थानिक समाजाने एकत्रितपणे विचार करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे कोकरे यांनी सांगितले. कोकण हा नैसर्गिक साधनसंपत्ती, समुद्रकिनारा, डोंगररांगा, जंगले, खनिजसंपत्ती, शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यटन आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध प्रदेश आहे. मात्र या संपत्तीचा स्थानिक भूमिपुत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी किती आणि कशा पद्धतीने उपयोग झाला, यावर व्यापक सार्वजनिक चर्चा होण्याची गरज आहे. त्यासाठीच कोकण भूमीदिन साजरा केला जाणार असून तो केवळ उत्सवाचा दिवस न राहता कोकणच्या प्रश्नांवर चिंतन, जनजागृती आणि लोकसहभागाचा दिवस बनवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

कोकणातील जमीन, पाणी, जंगल, समुद्रकिनारे आणि औद्योगिक प्रकल्पांशी संबंधित प्रश्नांबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, स्थानिकांना शिक्षण व कौशल्यविकास, शेती व मत्स्यव्यवसायाला बाजारपेठ, पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती या विषयांनाही अभियानाच्या माध्यमातून प्राधान्य दिले जाणार आहे. कोकणचा विकास कोकणच्या भूमिपुत्रांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, अशी अभियानाची भूमिका आहे.

या उपक्रमाचा केंद्रबिंदू कोणत्याही व्यक्तीपेक्षा कोकणची भूमी, कोकणची अस्मिता आणि कोकणच्या जनतेचे भवितव्य असल्याचेही अभियानाकडून स्पष्ट करण्यात आले. कोकण भूमीदिनाची तारीख, कार्यक्रमाचे स्वरूप, घोषणापत्र आणि आगामी जनजागृती अभियानाची रूपरेषा स्वतंत्र कोकणराज्य अभियानातर्फे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande