
अकोला, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्षांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अकोला महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी आणि कार्याध्यक्ष देवानंद ताले यांनी अकोला शहर व जिल्ह्यात पक्षाच्या माध्यमातून सुरू असलेल्या संघटनात्मक आणि जनहिताच्या कामांचा सविस्तर आढावा सादर केला.
अकोला येथे पक्षाच्या माध्यमातून सातत्याने करण्यात येणारी आंदोलने, जनतेच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न तसेच नागरिकांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या लढ्याची सविस्तर माहिती यावेळी प्रदेश नेतृत्वासमोर मांडण्यात आली.
अकोला पदाधिकाऱ्यांनी मांडलेला आढावा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच दोन्ही कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि रोहितदादा पवार यांनी गांभीर्याने ऐकून घेतला. संपूर्ण राज्याचा आढावा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि दोन्ही कार्याध्यक्षांनी घेतला.
अकोला महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी यांनी सादर केलेला अहवाल आणि अकोला शहरातील पक्षाच्या सक्रिय कार्याची माहिती पाहून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी रफीक सिद्दीकी यांचे कौतुक करून, “अकोल्यात पूर्ण ताकदीने काम करा. जे कार्यकर्ते सक्रियपणे पक्षाचे काम करीत आहेत, अशा कार्यकर्त्यांना पक्षात योग्य जबाबदाऱ्या व पदे देऊन पुढे आणा,” असे निर्देश दिले. तसेच अकोला शहरात संघटन मजबूत करून पूर्ण ताकदीने पक्षाचे काम करण्याचे आदेश त्यांनी दिले.
अकोला येथील पक्षाच्या कामकाजाची माहिती घेतल्यानंतर आगामी काळात अकोला संघटनेकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासनही प्रदेश नेतृत्वाकडून देण्यात आले.
महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी आणि कार्याध्यक्ष देवानंद ताले यांनी आगामी काळात अकोला येथे पक्षाच्या माध्यमातून विविध संघटनात्मक नियुक्त्या करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
तसेच आगामी काळात कार्याध्यक्ष रोहितदादा पवार यांचा अकोला येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. अकोला शहर व जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासह जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस अकोला महानगर कार्याध्यक्ष सैयद युसूफ अली, अकोला जिल्हा ग्रामीण निरीक्षक भीमराव हत्तीअंबीरे तसेच महानगर निरीक्षक गणेश राय यांचीही उपस्थिती होती. संपूर्ण राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतील या आढावा बैठकीमुळे अकोला महानगरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे