
अमरावती, 16 ऑगस्ट (हिं.स.)। नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. या बदलामुळे शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना वेळेत नवीन छापील पुस्तके मिळण्यात अडचणी आल्या. सुरुवातीला अनेक शाळांमध्ये नवीन पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाल्याची ओरड विद्यार्थी व पालकांकडून ऐकायला मिळाली. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आता 'ई-बालभारती' संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात इयत्ता पहिली ते बारावीची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे हवं ते पुस्तक आता एका क्लिकवर मिळवता येणार आहे.
पहिली ते बारावीपर्यतच्या सर्व माध्यम व विषयांची पाठ्यपुस्तके आता 'ई-बालभारती'वर उपलब्ध असल्याने पालकांची आर्थिक बचत होणार आहे. दरवर्षी शाळा सुरू होताच बाजारात ठराविक इयत्तांची पुस्तके उपलब्ध नसणे किंवा उशिरा मिळणे अशा तक्रारी टाळण्यासाठी असतात. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) आता सर्व पुस्तके डिजिटल स्वरूपात आणली आहेत.
विद्यार्थी, शिक्षक, पालक आपल्या मोबाइलसह संगणकावर एका क्लिकवर ही पुस्तके डाऊनलोड करू शकतात. तंत्रज्ञानाचा हा वापर विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थीही या पुस्तकातून अभ्यास करतात. त्यासाठी त्यांना संबंधित विद्यार्थ्यांकडून पुस्तकांची मागणी करावी लागायची. बाजारातून पुस्तके विकत घेतल्यास अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत होता. मात्र, एका क्लिकवर हवे ते पुस्तक सहज उपलब्ध होत असल्याने पुस्तकांचा संग्रह सोबत ठेवता येणार आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी