नाशिकच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती अद्याप प्रलंबित; मंत्री भुजबळ यांची स्पष्टोक्ती
येवला, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती अद्याप झालेली नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ पर्व’ या पुस्तिकेवर मं
Appointment of Guardian Minister


येवला, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची नियुक्ती अद्याप झालेली नाही, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ पर्व’ या पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा पालकमंत्री म्हणून उल्लेख असल्याबाबत विचारले असता, आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येवला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राष्ट्रीय व राजकीय विषयांवर रोखठोक भाष्य केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या न्यायालयीन संघर्षावर बोलताना, आपण सर्वजण संविधानावर निष्ठा ठेवणारे असून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, पान मसाला आणि विविध तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर ताशेरे ओढत, सिनेकलाकारांनी लोकांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करण्याचा मोह टाळायला हवा, असे सांगत एफडीएच्या नोटिशीचे समर्थन केले. याशिवाय राष्ट्रध्वजाबाबतच्या वादग्रस्त विधानांवर बोलताना, अशा प्रसिद्धीलोलुप वक्तव्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सुनावले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande