
चंद्रपूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। डोंगराच्या कुशीत वसलेले गाव, वाहन पोहोचण्यास अडचणीचा रस्ता, पावसाळ्यात जीवघेणी ठरणारी दगड-गोट्यांची वाट आणि मराठी भाषेचा अडसर अशा अनेक आव्हानांवर मात करत आरोग्य पथकाने जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी (वरची) येथील अतिजोखीम गरोदर मातेला सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटण येथे दाखल केले. स्वातंत्र्यदिनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आयुष्मान भारत केंद्र, पाटण येथे या महिलेची भेट घेऊन दुभाषकाच्या माध्यमातून तिच्या तब्येतीची विचारपूस केली.
घोडणकप्पी हे पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सुमारे २० किलोमीटर, तर नंदप्पा उपकेंद्रापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेले आदिवासी गाव आहे. येथे प्रामुख्याने आदिम कोलाम समाजाचे वास्तव्य आहे. गावाकडे जाणाऱ्या मार्गातील सुमारे ८०० मीटरची डोंगराळ आणि दगड-गोट्यांची बिकट वाट वाहनांसाठी मोठा अडथळा ठरते. पावसाळ्यात ही वाट आणखी निसरडी व धोकादायक होते. त्यात भाषेची अडचण असल्याने काही मातांच्या मनात आरोग्य तपासणी आणि रुग्णालयाबाबत भीती निर्माण होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
दुर्घटनेनंतर वाढली चिंता
घोडणकप्पी येथे १४ जून २०२६ रोजी दुसऱ्यांदा गरोदर असलेल्या संगीता तुळशीराम गेडाम यांना प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर डोंगर उतरवित असताना अतिरक्तस्रावामुळे वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर घोडणकप्पी येथील इंदिराबाई रामा जुमनाके यांच्या पाचव्या गरोदरपणाची विशेष काळजी घेतली जात आहे.
इंदिराबाई यांना अतिजोखीम गरोदर माता म्हणून आरोग्य यंत्रणेने नोंदविले आहे. त्यांच्या यापूर्वीच्या गरोदरपणातील वैद्यकीय इतिहास लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रसूतीपूर्वीच त्यांना सुरक्षित ठिकाणी दाखल करणे आवश्यक होते. त्यांचा रक्तदाब, रक्तातील साखर आणि हिमोग्लोबिनची पातळी १०.७ ग्रॅम असून, दोन सोनोग्राफी तपासण्या सामान्य आल्या आहेत. सोनोग्राफीनुसार २५ ऑगस्ट २०२६, तर मासिक पाळीच्या नोंदीनुसार ८ सप्टेंबर २०२६ ही संभाव्य प्रसूती तारीख आहे.
‘माता सखी’ ठरली संवादाचा दुवा
डोंगराळ भूप्रदेश, पावसाळ्यातील निसरडी वाट, वाहनांची अनुपलब्धता आणि प्रसूतीच्या वेळी डोंगर उतरविताना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटणचे पथक १० ऑगस्ट रोजी थेट घोडणकप्पी येथे पोहोचले.
इंदिराबाईंना मराठी भाषा समजण्यात अडचण असल्याने त्यांच्याशी संवाद साधणे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे महत्त्व पटवून देणे हे आरोग्य पथकासमोरील आणखी एक आव्हान होते. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माता सखी’ने यावेळी द्विभाषिक दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. माता सखीने इंदिराबाई आणि त्यांच्या कुटुंबीयांशी परिचित भाषेत संवाद साधून संस्थात्मक प्रसूतीचे महत्त्व समजावून सांगितले.
मुलांची चिंता आणि रोजंदारीचा प्रश्नही सुटला
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर घरी असलेल्या मुलांची व्यवस्था कशी होणार, त्यांच्या जेवणाची सोय कोण करणार तसेच पतीची रोजंदारी बुडल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार, अशा व्यावहारिक प्रश्नांमुळे कुटुंब साशंक होते.
ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी १५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांना दिलासा दिला. प्रसूती होईपर्यंत महिलेच्या रुग्णालयातील वास्तव्यात तिच्या मुलांसाठी पाटण येथील आश्रमशाळेत स्वतंत्र खोली, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पतीची बुडणारी मजुरी भरून काढण्यासाठीही मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, पाटणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता महेश शर्मा, डॉ. छाया शेडमाके, स्टाफ नर्स सुषमा शिरभये, अनुसया येमले, पल्लवी फुलझेले, सुपरवायझर यशोदा राठोड आदी उपस्थित होते.
घोडणकप्पी रस्त्यासाठी ५२.९७ लाखांचे अंदाजपत्रक
दरम्यान, घोडणकप्पी गावाला जाणाऱ्या रस्त्याच्या विकासासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. घोडणकप्पी पोचमार्ग वन विभागाच्या अखत्यारितील क्षेत्रातून जात असल्याने रस्त्याच्या विकासासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे.
पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता केवळ डांबरीकरण केल्यास रस्त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पर्जन्यमानाचा विचार करून या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामासाठी ५२.९७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
दुर्गम भागातील गरोदर मातांना वेळेत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी प्रशासनाकडून रस्ते, आरोग्य सुविधा आणि स्थानिक पातळीवरील संवादव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला जात आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव