
चंद्रपूर, 16 ऑगस्ट, (हिं.स.)। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे साहित्य हे केवळ इतिहासाचा दस्तऐवज नसून राष्ट्रभक्ती, सामाजिक सुधारणा, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि स्वातंत्र्याच्या विचारांची प्रेरणा देणारे साहित्य आहे. सावरकरांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास करून त्यातील विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, त्यांचे साहित्य राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हायला शिकवते असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर साहित्य अध्यासन केंद्राच्या वतीने विभाजन विभिषिका दिनानिमित्त चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात नुकत्याच आयोजित ‘सावरकरांचे साहित्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, महापौर संगीता खांडेकर, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रशांत दोनतूलवार , स्वप्निल दोनतूलवार, गुरुदास कामडी, संजय गोरे, अध्यासन केंद्राचे समन्वयक मनीष देशपांडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पोक्षे पुढे म्हणाले की, सावरकरांनी कविता, नाटक, कादंबरी, इतिहास, आत्मचरित्र, सामाजिक व राजकीय लेखन अशा विविध साहित्यप्रकारांतून आपले विचार मांडले. त्यांच्या साहित्यामध्ये तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि राष्ट्रीय परिस्थितीचे प्रतिबिंब दिसून येते.
सावरकरांच्या लेखनातील राष्ट्रनिष्ठा, सामाजिक समता, आणि स्वावलंबन यांसारख्या विविध पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकला. शिक्षण कसं असावे तर देशाच्या संस्कृतीचे प्रतिबिंब त्यात असावे . मन आणि मेंदूचा विकास करते ते शिक्षण.
विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विविध साहित्यकृतींचे वाचन करावे. वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि समाज व राष्ट्राच्या जडणघडणीतील विविध प्रवाह समजून घेण्यास मदत होते, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटक म्हणून बोलताना पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी किती लोकांचे बलिदान गेले हे कायम लक्षात घेणे गरजेचे आहे. महापुरुषांचे चरित्रही समजून घेतली पाहिजे अशा कार्यक्रमातून त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू समोर येतात असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात मंगेश देऊरकर यांनी 'ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सावरकरांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे : डॉ.प्रशांत बोकारे
समाज हा टिप कागदासारखा असतो. त्याला जे घ्यायचे ते तो बरोबर घेतो. सावरकरांचे साहित्य हे समाजापुढे आले पाहिजे. ही अध्यसनाची भूमिका आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या स्वातंत्र्य योद्ध्याचे विचार हे समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत, ते अधोरेखित झाले पाहिजेत असे ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव