
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भाजपकडून काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते सतर्क झाले. संभाव्य तणावाची परिस्थिती टाळण्यासाठी तसेच शांततेचा संदेश देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर ठिय्या देत भजन-कीर्तन सुरू केले.
हातात टाळ-मृदंग घेऊन कार्यकर्त्यांनी भजनाच्या माध्यमातून शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारल्याचे दिसून आले.
दरम्यान, काँग्रेस भवन परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भजन-कीर्तनाचा मार्ग स्वीकारल्याने शहरात या अनोख्या भूमिकेची चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis