शेतकरी हित आणि सहकाराची परंपरा जपत विलास साखर कारखाना प्रगतीपथावर - अमित देशमुख
लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न काळाची गरज ओळखून आणि भविष्याचा वेध घेऊन विलास सहकारी साखर कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करतील
अमित देशमुख


लातूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

विलास सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २४ वी

वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

काळाची गरज ओळखून आणि भविष्याचा वेध घेऊन विलास सहकारी साखर कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्वच साखर कारखाने एआय तंत्रज्ञानाचा वापर करतील. ऊस तोडणीत १०० टक्के यांत्रिकीकरण आणतील, सीबीजी सारख्या नाविन्यपूर्ण उपपदार्थाची निर्मिती करतील. या माध्यमातून शेतकरी शेतमजूर आणि कामगारांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरू राहतील अशी ग्वाही विलास सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

राज्यात उद्योग बंद पडत असताना आणि बेरोजगारी वाढत असताना मांजरा परिवारातील सर्व कारखाने शेतकरी हिताला प्राधान्य देत भक्कमपणे उभे आहेत. कारखान्याला आजवर मिळालेले ३९ पुरस्कार हे सर्व सभासदांच्या सहकार्याचे फलित आहे. असे सांगून मांजरा परिवारातील कारखान्यांमध्ये ऊसाला उच्चांकी भाव देण्याची निकोप स्पर्धा अशीच कायम राहील, असाही विश्वास व्यक्त केली

विलास सहकारी साखर कारखाना ली. वैशालीनगर (निवळी, ता. जि. लातूर) अधिमंडळाची सन २०२५-२६ ची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी शहरातील हॉटेल वैष्णव येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या प्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, माजी आमदार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार व्हा.चेअरमन वैजनाथराव शिंदे, महापौर जयश्री सोनकांबळे, आदीसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, विलास सहकारी साखर कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञान व उच्चांकी भावासाठी प्रयत्नशील

- आमदार अमित देशमुख

सभेला संबोधित करताना आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांच्या प्रेरणेतून लातूर तालुक्यात मांजरा कारखान्यापाठोपाठ विलास सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. आज २४ वर्षांच्या यशस्वी प्रवासात सभासदांची खंबीर साथ लाभली आहे. येणाऱ्या काळात उसाचे नवनवीन वाण, वाढीव उत्पादकता, अधिक साखर उतारा आणि आधुनिक ऊसशेतीचा अभ्यास करण्यासाठी शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातील.

पुढे बोलताना ते म्हणाले, सध्या राज्यात उदयोग बंद पडत आहेत त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत मांजरा परीवार मोठया प्रमाणात रोजगार निर्माण करीत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पारदर्शक नोकर भरती केली आहे. ही नोकर भरती माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पारदर्शकता व गुणवत्तेला प्राधान्य देऊन झाली आहे. बॅकेचे चेअरमन धीरज देशमुख हे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सक्षमीकरण करत आहेत. ही बॅक आता एसबीआय, आयसीआय, एचडीएफसी बॅके प्रमाणे सुवीधा देत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande