रत्नागिरी : बाल गणेशमूर्ती स्पर्धेत ईशान नेवरेकर प्रथम
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । कांचन डिजिटल आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालगणेशमूर्ती स्पर्धेत ईशान नेवरेकरने प्रथम क्रमांक पटकावला. बालकलाकारांच्या हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी गणपती साकारणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होत
रत्नागिरी : बाल गणेशमूर्ती स्पर्धेत ईशान नेवरेकर प्रथम


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । कांचन डिजिटल आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालगणेशमूर्ती स्पर्धेत ईशान नेवरेकरने प्रथम क्रमांक पटकावला.

बालकलाकारांच्या हस्तकौशल्याला वाव देण्यासाठी गणपती साकारणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत ३५५ बालकलाकारांच्या बालहातांनी अप्रतिम गणपती बाप्पा साकारले. जिल्ह्यातील अशी ही पहिलीच अनोखी स्पर्धा ठरली आहे.

आज येथील जयेश मंगल पार्कमध्ये झालेल्या या स्पर्धेत यंदा विद्यार्थ्यांसोबत आलेल्या पालकांनाही गणपती साकारण्याची संधी देण्यात आली. गतवर्षीपासून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरीच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते आणि नगरसेविका, महिला, बालकल्याण समिती सभापती सौ. प्रीती सुर्वे, नगरसेवक निमेश नायर, नगरसेवक संजय हळदणकर, नगरसेविका सौ. पूजा पवार, सौ. नाहीदा सोलकर, सौ. वैभवी खेडेकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. पिलणकर, सौ. कळंबटे, सौ. रुक्सार खान, सौ. पाटील, सौ. आफरीन होडेकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे, उद्योजक प्रसन्न आंबुलकर, देवम जैन, विकी जैन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कांचन मालगुंडकर यांनी या स्पर्धेचा उद्देश सांगून रत्नागिरी नगर परिषदेने सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. रत्नागिरीमधील प्रसिद्ध मूर्तिकार ओंकार पाटणकर यांनी विद्यार्थ्यांसमोर आपल्या हस्तकौशल्याने सुबक गणपती मूर्ती तयार केली आणि मूर्ती घडविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या हातातला मोबाइल काही वेळ बाजूला ठेवून त्यांच्या हातात माती देण्याचे मौलिक काम स्पर्धेने केले.

स्पर्धेतील विजेते असे - प्रथम ईशान साईनाथ नेवरेकर (पटवर्धन हायस्कूल), रुद्र राजेंद्र गुरव (जीजीपीएस गुरुकुल), ओम तोडणकर (पटवर्धन हायस्कूल). स्पर्धेत १२ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू, आकर्षक शिल्ड देण्यात आले. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू आणि सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande