रत्नागिरी : राज्यभर २१ ऑगस्टला महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । येत्या २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनी राज्यभर महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकासासाठी मृद्संधारण व जलसंधारणाबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यात हा उपक्रम मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येणार
महावॉकेथॉन


रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । येत्या २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनी राज्यभर महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे.

शाश्वत विकासासाठी मृद्संधारण व जलसंधारणाबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यात हा उपक्रम मृद व जलसंधारण विभागातर्फे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाची संकल्पना सेव्ह सॉइल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो ( Save Soil, Save Water, Secure Tomorrow) अशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा हे घोषवाक्य आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ ऑगस्ट रोजी कमाल ३ किलोमीटर चालणे आणि मृद् व जलसंधारणाची शपथ घेणे असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. शाश्वत विकासासाठी मृद्संधारण व जलसंधारण आवश्यक असून त्याचे महत्त्व पटवून देण्याकरिता राज्यात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आणि १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी, २०२७ दरम्यान जलसंधारण अभियान आयोजित करण्यात येत आहे. तर २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत शाश्वत विकासासाठी मृद्संधारण व जलसंधारणाबाबत महावॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर या उपक्रमाचे आयोजन करून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले असून मृद् व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी या लोकचळवळीत राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबईत होणार असून प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख जिल्हास्तरीय मृद् व जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सर्व मंत्री, सर्व राज्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष/उपाध्यक्ष, महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य, सर्व महापालिका/नगरपालिका/नगरपंचायत सदस्य आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, सर्व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील नामांकित व प्रतिष्ठित व्यक्ती, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, जिल्ह्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी, एनसीसी, एनएसएस, माय भारत, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट्स अँड गाइड्स, रेड क्रॉस, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब सदस्य, लायन्स क्लब सदस्य, रनिंग क्लब सदस्य, सायकलिंग क्लब सदस्य, उद्योग व व्यापारी संघटना, सीएसआर भागीदार कंपन्या, विविध क्रीडा संघटना, गुड मॉर्निंग ग्रुप्स, विविध व्यायाम शाळा, स्वयंसेवी संस्था, महिला, राज्याचे नागरिक यांना सहभागी करण्यात येणार आहे.

महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर आधारित ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी महावॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे, तर प्रथम दहा विजेत्यास जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande