
परभणी, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कीटकनाशक तपासणी व अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच देशी, नैसर्गिक शेती व मसाला पिके परिसंवादाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित राहून शेतकरी, कृषी क्षेत्रातील मान्यवर तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे कृषी उत्पादनांमधील कीटकनाशकांच्या अवशेषांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी व विश्लेषण करणे शक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम कृषी उत्पादनासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
देशी व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देतानाच मसाला पिकांच्या उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, उत्पादनक्षमता वाढविणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या दृष्टीने हा परिसंवाद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक शेती पद्धतींचा योग्य समन्वय साधणे ही आजची गरज आहे.
कृषी विद्यापीठ, संशोधक, कृषी अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील समन्वयातून मराठवाड्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि समृद्ध करण्यासाठी अशा उपक्रमांना निश्चितच बळ मिळेल.
यावेळी कृषिमंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे, पालकमंत्री मेघनादीदी बोर्डीकर, आ.डॉ.रत्नाकरजी गुट्टे , आमदार बालाजीराव कल्याणकर, कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मनी, जिल्हाधिकारी संजयजी चव्हाण, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथूर, महापौर सय्यद इक्बाल खाजा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis