छ. संभाजीनगर - सिडको बसस्थानकातील अस्वच्छतेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकाऱ्यांना तंबी
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसटी बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदा
Q


छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सर्वसामान्य प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसटी बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. या सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बसस्थानकातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. सार्वजनिक प्रसाधनगृहाची पाहणी करताना तेथील अस्वच्छता, अपुरी देखभाल तसेच कर्मचाऱ्यांचा अभाव त्यांच्या निदर्शनास आला. याबाबत प्रवाशांकडूनही तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी बाह्य संस्थांची नियुक्ती करण्यात आली असताना संबंधित संस्थांकडून निर्धारित निकषांनुसार काम करून घेणे आणि त्यावर सातत्याने देखरेख ठेवणे ही स्थानिक अधिकारी व प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, या मूलभूत कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल मंत्री सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

“बाह्य संस्थेला काम दिले म्हणून अधिकाऱ्यांची जबाबदारी संपत नाही. प्रवाशांना प्रत्यक्षात स्वच्छता आणि आवश्यक सुविधा मिळत आहेत की नाही, याची नियमित पाहणी करणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत उदासीनता अजिबात सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या संस्थांकडून योग्य प्रकारे काम करून न घेणाऱ्या तसेच देखरेखीत कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांना स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावर उपस्थित असलेल्या प्रवाशांशी थेट संवाद साधला. प्रवाशांच्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याबाबत माहिती घेतली. प्रवाशांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande