अवयवदानासाठी प्रत्येकाने किमान 5 जणांना प्रेरित करावे
‘गोल्डन अवर’मधील प्रत्येक मिनिट महत्त्वाचे ‘स्वॅप डोनेशन’ची संकल्पना लवकरच सुरू होणार नागपूर, 16 ऑगस्ट (हिं.स.) : अवयवदानासंदर्भातील गैरसमज, भीती आणि विविध मिथक दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असून, अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून म
आयएमएतर्फे नागपुरात अवयवदानानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे छायाचित्र


‘गोल्डन अवर’मधील प्रत्येक मिनिट महत्त्वाचे

‘स्वॅप डोनेशन’ची संकल्पना लवकरच सुरू होणार

नागपूर, 16 ऑगस्ट (हिं.स.) : अवयवदानासंदर्भातील गैरसमज, भीती आणि विविध मिथक दूर करण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असून, अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून मृत्यूनंतरही दुसऱ्याला जीवन देणारी मानवतावादी चळवळ आहे. या चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रत्येकाने अवयवदानाचा ‘ऍम्बेसेडर’ बनून किमान 5 जणांना अवयवदानासाठी प्रेरित करावे, असे आवाहन करण्यात आले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त अवयव व ऊतीदानाबाबत जनजागृती करण्यासाठी रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशन ऑडिटोरियममध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टरच्या वतीने इंडियन मेडिकल

असोसिएशन, नागपूर शाखा, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर (झेडटीसीसी), नागपूर, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस, नेफ्रोलॉजी सोसायटी आणि सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, नागपूर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील प्रमुख पाहुणे, तर झेडटीसीसी नागपूरचे प्रमुख मनीष श्रीगिरीवार आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमात डॉक्टरांनी रॉबर्ट नोएल टेस्ट यांची ‘To Remember Me’ ही कविता सादर केली. या कवितेचा मराठी अनुवाद डॉ. सुनंदा चावजी यांनी केला होता. डॉ. मंजूषा मार्डीकर लिखित आणि संजय पेंडसे दिग्दर्शित ‘जीवनदान अंगदान महान’ ही लघुनाटिका सादर करण्यात आली. डॉ. अंजली भांडारकर यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली. यावेळी अवयवदाते तसेच अवयव प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव कथन केले.

असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, विदर्भ चॅप्टरच्या अध्यक्ष डॉ. तनुजा मनोहर यांनी प्रास्ताविकातून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सचिव डॉ. अश्विनी तायडे आणि गिरा सोवनी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. संशोधन समितीच्या अध्यक्ष डॉ. मंजुषा मार्डीकर यांनी अवयवदान चळवळीचा इतिहास आणि त्याची सामाजिक गरज विशद केली. सूत्रसंचालन डॉ. शिल्पा देवके आणि डॉ. शिल्पा कुथे यांनी केले.

‘गोल्डन अवर’मध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे : विश्वास नांगरे पाटील

‘ग्रीन कॉरिडॉर’विषयी सविस्तर माहिती देताना विश्वास नांगरे पाटील यांनी अवयव प्रत्यारोपणासाठी ‘गोल्डन अवर’मध्ये अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविण्यात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, विविध यंत्रणांमधील समन्वय, विशेष मार्ग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कसे केले जाते, याची माहिती त्यांनी दिली.

या प्रक्रियेत अनेक आव्हाने असली तरी विविध यंत्रणांमधील प्रभावी समन्वयामुळे अवयव वेळेत प्रत्यारोपण केंद्रापर्यंत पोहोचविणे शक्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्वॅप डोनेशन’ची संकल्पना लवकरच : मनीष श्रीगिरीवार

अवयवदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘मिशन ब्रिज’सारख्या उपक्रमांची माहिती देताना मनीष श्रीगिरीवार यांनी ‘स्वॅप डोनेशन’ची संकल्पना एम्स, नागपूर येथे लवकरच सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. या माध्यमातून रुग्णांना तुलनेने लवकर अवयव उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande