
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
नीट पेपरफुटीनंतर देशभरात मोठं आंदोलन उभारलं होतं, दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीने आंदोलनं केलं, तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 23 दिवस उपोषण केले. त्यानंतर, सरकारने एक पाऊल मागे घेत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला. तसेच, पेपरफुटी आणि परीक्षांमधील घोळाच्या अनुषंगाने कडक कायदाही संसदेत पारित केला. तरीही परीक्षा आणि नोकरीसाठीच्या परीक्षांमधील घोळ काही केल्या कमी होताना दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपीक पदाच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, आज राज्यातील विविध जिल्ह्यात हायकोर्ट लिपिक पदासाठी परीक्षा होत आहे. शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगरमधील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होताच सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेष म्हणजे लांबून आलेल्या परीक्षार्थींना अचानक आलेल्या या तांत्रिक अडचणीचा फटका बसल्यानं केंद्रावर संतापाचं वातावरण निर्माण झालं. काही परीक्षार्थींनी गोंधळ घातल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिकाऱ्यांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी परीक्षा पुन्हा घेतली जाणार की परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ दिला जाणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तांत्रिक बिघाडाचा फटका परीक्षार्थींना बसल्याने आता परीक्षा प्रशासन काय निर्णय घेतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र, परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राबाहेरच ठिय्या केल्याचं दिसून आलं. कल्याणमध्येही परीक्षेवेळी गोंधळ दरम्यान, कल्याण एपीएमसी मार्केटमध्येही हायकोर्टातील लिपिक पदासाठी परीक्षा सुरू होती, येथे सुरू असलेल्या परीक्षेतही गोंधळ उडाल्याने परीक्षार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हायकोर्टातील लिपिक पदावर नियुक्तीसाठी ही परीक्षा सुरू आहे, त्यात गोंधळ उडाला. परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक की बोर्ड मध्ये बिघाड असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षार्थींच्या आरोपानुसार, सरावासाठी दिलेले की - बोर्ड खराब असल्यानं सराव करता आला नाही आणि मोलाचा वेळ वाया गेला. याशिवाय, अधिकृत संकेतस्थळावर पूर्वसूचना न देता शेवटच्या क्षणी परीक्षा 'स्क्रीन-टू-स्क्रीन' घेणार असल्याचे सांगण्यात आल्यानं गोंधळात भर पडली.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis