
नांदेड, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
राज्यव्यापी ‘शिवदुर्गा : शिवसंवाद दौरा’ आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याअंतर्गत नांदेड दक्षिण,नांदेड उत्तर आणि लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघांची महिला आघाडीची बैठका उत्साहात नांदेड येथे पार पडली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक प्रभाग, गाव आणि शाखास्तरावर महिला पदाधिकाऱ्यांचे संघटन अधिक मजबूत करणे, नव्या महिला शाखाप्रमुखांची नियुक्ती करून संघटन विस्ताराला गती देणे, मतदारयादी पुनरीक्षण (SIR) प्रभावीपणे राबविणे, बूथनिहाय रचना बळकट करणे, जनसंपर्क वाढविणे तसेच आगामी निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर प्रभावी नियोजन करणे, या विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
महिला आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत अधिक व्यापकपणे पोहोचवून संघटना मजबूत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्न, नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि संघटनात्मक उपक्रमांना प्राधान्य देत पक्षाची ताकद अधिक वाढवावी, यावरही भर देण्यात आला.
त्यावेळी खासदार डॉ.ज्योतीताई वाघमारे,विधानपरिषद गटनेते आमदार हेमंतभाऊ पाटील,आमदार बालाजीराव कल्याणकर,उपनेत्या कलाताई शिंदे,माजी आमदार तथा उपनेत्या संगीताताई ठोंबरे,उपनेत्या विजयाताई पोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा संध्याताई बालाजीराव कल्याणकर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अपर्णा नेरलकर यांसह नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण आणि लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघांतील महिला आघाडीच्या पदाधिकारी, जिल्हा व तालुका पदाधिकारी, शाखाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis