
अमरावती, 16 ऑगस्ट (हिं.स.) | शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून निर्माण केलेल्या नांदगावपेठ–मोर्शी–वरूड–पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे व भेगा पडल्या आहेत. या निकृष्ट रस्त्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. असे असताना, खराब झालेल्या रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी सध्या याच खड्ड्यांमध्ये व भेगांमध्ये केवळ डस्ट, जळालेले ऑइल व इतर साहित्य टाकून वरवरची थातुरमातुर दुरुस्ती केली जात असल्याचा गंभीर प्रकार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उघडकीस आणला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेली ही निकृष्ट दर्जाची व नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करणारी दुरुस्तीची कामे तत्काळ बंद करण्यात यावीत. तसेच खराब झालेल्या सिमेंट रस्त्याची केवळ डागडुजी न करता, तांत्रिक पद्धतीने खराब भाग खोदून काढून त्या ठिकाणी नव्याने दर्जेदार रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी रुपेश वाळके यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ–मोर्शी–वरूड ते मध्यप्रदेशातील पांढुर्णा यांना जोडणाऱ्या सुमारे ९६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल ५३० कोटींचा खर्च करून अवघ्या काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा, खड्डे, रस्ता दबणे आणि पॅनेल खराब होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नांदगाव पेठ पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर साडेचार मीटरच्या आसपासचे अनेक सिमेंट पॅनेल तयार करण्यात आले आहेत. या पॅनेलपैकी अनेक ठिकाणी भेगा पडल्याने रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. काही ठिकाणी रस्ता दबल्यामुळे वाहनांना अचानक धक्का बसतो. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा धोका निर्माण झाला असून, रात्रीच्या वेळी हे खड्डे आणि दबलेला रस्ता अधिक धोकादायक ठरत आहे. ज्या उद्देशाने जुना खड्डेमय डांबरी रस्ता बदलून कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंटचा नवीन राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला, तोच महामार्ग काही वर्षांत खराब होत असेल तर जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग 'कुंभकर्णी झोपेत' असल्याचा आरोप नागरिकांतर्फे करण्यात येत असून महामार्गावरील समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच संबंधित कंत्राटदाराकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरूच राहिला तर राष्ट्रीय महामार्गावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी