
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। बसस्थानकावरील प्रसाधनगृहातील अस्वच्छता, कामात हलगर्जीपणा आणि एकंदर प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यामध्ये दाखवलेली उदासीनता याबद्दल विभाग नियंत्रक व संबंधित आगार व्यवस्थापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. तसेच पुढील ७ दिवसात या संदर्भात तातडीने अहवाल द्यावा असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेले आहेत.
प्रवाशांच्या सेवेत असलेली ‘लालपरी’ केवळ प्रवासाचे साधन नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळालेच पाहिजे. यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करावे, अशी स्पष्ट भूमिका मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी मांडली.
सिडको बसस्थानकातील पाहणीच्या निमित्ताने त्यांनी “प्रवाशांच्या सुविधांमध्ये हलगर्जीपणा नको, जबाबदारी निश्चित करा आणि तातडीने सुधारणा करा” असा स्पष्ट संदेश एसटी प्रशासनाला दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis