
यवतमाळ, 16 ऑगस्ट (हिं.स.)। पावसाळ्याच्या दिवसांत चहूकडे पसरलेली हिरवीगार शाल, निसर्गाचे मनोहारी रूप आणि डोळ्यांना भुरळ घालणारी वनराई पण याच निसर्गरम्य वातावरणात यवतमाळ जिल्ह्यातील समृद्ध अशा सागवान जंगलावर पानगळीचे सावट पसरले आहे. सागवानाची ही झाडे अचानक करपल्यासारखी आणि निष्पर्ण दिसू लागली आहेत. हिरवीगार असणारी पाने आता भुरी, तपकिरी पडून पोखरली जात आहेत.संपूर्ण जंगलासह उमरखेड आणि महागाव वनपरिक्षेत्रासह प्रसिद्ध टिपेश्वर, पैनगंगा अभयारण्य परिसर आणि अनेक मार्गावरील दुतर्फा असलेल्या दाट सागवानाच्या वनराईला या किडीने कचाट्यात पकडले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही समस्या सागवानावर पडणाऱ्या ‘पान पोखरणारी अळी’ किंवा ‘पानांचा सांगाडा करणारी अळी’ यांच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. या अळ्या पानांमधील हिरवागार भाग (क्लोरोफिल) फस्त करतात. सुरुवातीला पानांवर लहान छिद्रे पडतात आणि काही दिवसांतच संपूर्ण पान कुरतडले जाते. शेवटी उरतात त्या फक्त पानांच्या कोरड्या शिरा. लांबून पाहिल्यास जणू संपूर्ण जंगल आगीत करपून गेल्याचा भास होतो. पावसाळ्यात फुटणारी नवीन कोवळी पालवी, वातावरणातील विशिष्ट आर्द्रता आणि तापमान या अळ्यांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरते.
स्थानिक नागरिक या प्रकाराला ‘अज्ञात रोग’ म्हणून संबोधत असले, तरी तज्ज्ञांच्या मते केवळ पाने सुकण्यावरून रोगाचे निदान करणे घाईचे ठरेल. किडीची अंडी, पानांवरील छिद्रे आणि प्रादुर्भावाची पद्धत या सर्वांची वैज्ञानिक तपासणी होणे गरजेचे आहे. सागवानामध्ये पुन्हा पालवी फोडण्याची नैसर्गिक क्षमता असली, तरी वारंवार होणाऱ्या अशा पर्णनाशामुळे विशेषतः लहान झाडांची आणि रोपट्यांची वाढ कायमची खुंटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. जंगलातील ही कीड रोखण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे निसर्गाच्या परिसंस्थेला घातक ठरू शकते. जंगलात या अळ्यांना खाणारे पक्षी, परजीवी कीटक असे नैसर्गिक शत्रू आधीच अस्तित्वात असतात. त्यामुळे वनविभागाने जैविक आणि पर्यावरणपूरक उपायांचा विचार करावा, अशी आग्रही मागणी निसर्गप्रेमींकडून होत आहे.
जिल्ह्यातील नेमके किती क्षेत्र आणि कोणती झाडे बाधित आहेत, याचा अचूक डेटा तयार करावा. दर दोन-चार वर्षांनी येणाऱ्या या संकटाचे चक्र समजून घेण्यासाठी दरवर्षी त्याची शास्त्रीय नोंद ठेवण्याची मागणी होत आहे. तसेच बाधित पानांचे नमुने त्वरित तज्ज्ञांकडे पाठवून कारणांचा शोध घ्यावा, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे. यवतमाळची सागवान वनांचा जिल्हा अशी नैसर्गिक ओळख आहे. निसर्गाचे हे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी वनविभागाने प्रत्यक्ष पाहणी करून या पानगळीमागचे सत्य समोर आणावे, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी