
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘३६० एक्स्प्लोरर’चे संस्थापक आणि एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई केली. १५ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ८ वाजता आनंद बनसोडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिखर गाठून तिरंगा फडकवत स्वातंत्र्यदिन साजरा केला. गेल्या काही दिवसांपासून माऊंट कोसिअस्को परिसरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत असल्याने मोहिमेदरम्यान गिर्यारोहकांसमोर खराब हवामानाचे आव्हान होते. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आनंद बनसोडे आणि त्यांच्या चमूने शिखर गाठले.या वेळी शिखरावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवून देशाला अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. या मोहिमेत आनंद बनसोडे यांच्यासोबत पुण्याच्या स्मिता घुगे यांनीही माऊंट कोसिअस्को सर केले. त्यांनी शिखरावर सर्वात मोठा तिरंगा फडकवून नवा विक्रम नोंदविल्याचा दावा करण्यात आला आहे.
सांगलीचे तुषार सुभेदार आणि म्हैसूरचे प्रीत यांनीही ही चढाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. आनंद बनसोडे यांनी यापूर्वी २०१४ आणि २०२३ मध्ये माऊंट कोसिअस्को सर केले होते. आता २०२६ मध्ये तिसऱ्यांदा हे शिखर सर करत त्यांनी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. याशिवाय आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो, युरोपमधील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस आणि ऑस्ट्रेलियातील माऊंट कोसिअस्को ही तीनही शिखरे प्रत्येकी तीन वेळा सर करण्याचा टप्पाही त्यांनी गाठला आहे.“एके काळी स्वतः ही सर्व शिखरे सर करत होतो. आता इतरांना सोबत घेऊन ही शिखरे सर करताना विशेष आनंद होत आहे. भारताचा तिरंगा जगातील महत्त्वाच्या शिखरांवर अभिमानाने फडकवणे ही केवळ गिर्यारोहणाची कामगिरी नसून, देशाला दिलेली मानवंदना आहे,” अशी भावना आनंद बनसोडे यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड