
रत्नागिरी, 16 ऑगस्ट (हिं.स.) । लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या प्रक्रिया उद्योगाचे भूमिपूजन लांज्यात आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाले. या उद्योगामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ व मूल्यवर्धनाची संधी मिळणार आहे.
लांजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर काजूचे उत्पादन घेतले जाते. मात्र कच्चा काजू विकण्याऐवजी त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होऊ शकते. ही गरज लक्षात घेऊन कॅश्यु फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
भूमिपूजनप्रसंगी आमदार किरण सामंत यांनी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे प्रक्रिया उद्योग महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी केवळ कच्चा माल विकण्याऐवजी त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते. लांजा तालुक्यात काजू उद्योगाची मोठी क्षमता असून या क्षमतेचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काजू उत्पादनाला स्थानिक ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार पॅकिंग आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, तसेच भविष्यात मोठ्या बाजारपेठांमध्ये विक्री वाढविण्याच्या दृष्टीनेही या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तसेच काजू हंगामात स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढण्याची शक्यता आहे. महिलांना काजू सोलणे, ग्रेडिंग, पॅकिंग आदी कामांमध्ये रोजगार मिळू शकतो. तसेच युवकांना प्रक्रिया उद्योग, व्यवस्थापन, मार्केटिंग, लॉजिस्टिक्स आणि विक्री क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, शिवसेना तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, लीला घडशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी व संचालक, काजू उत्पादक शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी