
छत्रपती संभाजीनगर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकीला पोलिसांनी जॅमर लावल्याच्या रागातून संतप्त झालेल्या चालकाने चक्क स्वतःचीच कार पेटवून दिल्याची घटना घडली आहे. जॅमर काढण्यासाठी वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप चालकाकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चालकाने आपली चारचाकी रस्त्यावर पार्क केली होती. त्यानंतर पोलिसांनी या वाहनाला जॅमर लावला. वाहनाला जॅमर लावल्यानंतर चालकाने तो काढण्यासाठी पोलीस तसेच महानगरपालिका प्रशासनाकडे विनंती केल्याची माहिती आहे. मात्र, वारंवार विनंती करूनही जामर काढण्यात आला नाही, असा चालकाचा आरोप आहे.
जॅमर काढण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने चालक संतप्त झाला. त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कारलाच आग लावल्याचे समोर आले आहे. भररस्त्यात कार पेटवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही वेळातच वाहनातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. भररस्त्यात वाहन पेटवल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis