हिंजवडी मेट्रोला मंजुरी, पीएमआरडीएचे सरकारला पत्र; उद्घाटनाची तारीख अद्याप निश्चित नाही
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)। हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) प्रवासी वाहतु
Metro Train


पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची पुणेकरांसह लाखो आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) प्रवासी वाहतुकीसाठी २३ जुलै रोजी मंजुरी मिळून तीन आठवडे उलटले, तरी प्रत्यक्ष सेवा सुरू झालेली नाही.

या मेट्रो सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा राज्य सरकारचा आग्रह असल्याचे समोर आले आहे. मात्र, पंतप्रधानांची वेळ अद्याप निश्चित झालेली नसल्याने उद्घाटन लांबणीवर पडल्याची माहिती आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलै रोजी मंजुरी दिली. त्यामुळे या मार्गावरील सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.

सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) राज्य सरकारला पत्र पाठवून मेट्रोच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नाही.

हिंजवडी आयटी पार्क आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागादरम्यान दररोज मोठ्या संख्येने नागरिक व आयटी कर्मचारी प्रवास करतात. या मार्गावर मेट्रो सेवा सुरू झाल्यास हिंजवडी, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सज्ज असताना केवळ उद्घाटनाच्या तारखेअभावी ती सुरू होण्यास विलंब होत असल्याने पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या पत्रानंतर राज्य सरकारकडून उद्घाटनाची तारीख कधी निश्चित केली जाते आणि मेट्रो सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande