
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या प्रकरणात एप्रिल २०२६ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यात प्रा. रामदास झोळ यांच्यासह आणखी दोघांना सहआरोपी करण्यात आले असून, पोलिसांनी राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांना अटक केली आहे.
कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात एप्रिल २०२६ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मनोहर ऊर्फ मामा चंद्रकांत भोसले याच्यासह अन्य आरोपींविरोधात पोलिसांचा तपास सुरू आहे. मनोहर मामा भोसले याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान प्रा. रामदास झोळ, राजेंद्र गोपाळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे यांची नावे समोर आल्याने त्यांना याच गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे. त्यापैकी हुंबे आणि लिगाडे यांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. या माध्यमातून कथितरीत्या झालेल्या पैशांच्या व्यवहारांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघांची नावे तपासात समोर आल्यानंतर कुर्डूवाडी परिसरात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणातील अन्य बाबी तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड