
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)। शाश्वत विकासासाठी मृदसंधारण आणि जलसंधारणाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी २१ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.‘सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमॉरो’ (Save Soil, Save Water, Secure Tomorrow) ही या उपक्रमाची थीम असून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांत २१ ऑगस्ट रोजी कमाल तीन किलोमीटर अंतराची ‘महा वॉकेथॉन’ आयोजित केली जाणार आहे. या वेळी सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथही देण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. मृदसंधारण आणि जलसंधारण हे शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक असल्याने त्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.याअंतर्गत १५ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती वाढविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि मृद व जलसंधारणाच्या उपाययोजनांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये राज्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि जलसंवर्धनाची लोकचळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु