मंगळवेढ्याचा वीरपुत्र वैभव आवताडे शहीद
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)। देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय ३१) यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या वैभव यांच्या न
evm


सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील जवान वैभव तात्यासाहेब आवताडे (वय ३१) यांना वीरमरण आले. भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या वैभव यांच्या निधनाची अधिकृत माहिती नुकतीच कुटुंबीयांना देण्यात आली. या घटनेमुळे गणेशवाडीसह संपूर्ण मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत वैभव आवताडे यांनी सुमारे ११ वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. जम्मू येथील आव्हानात्मक परिस्थितीत सेवा बजावत असताना त्यांना वीरमरण आले.

काही दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून वैभव पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. १३ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता त्यांनी पत्नी आणि आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. कुटुंबीयांची विचारपूस करणारा हा संवाद त्यांचा शेवटचा ठरेल, याची कल्पना त्यावेळी कोणालाही नव्हती.

वैभव आवताडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दिपाली आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन वर्षांची मुलगी देवांशी आणि एक वर्षाचा मुलगा देवांश आहे. वैभव यांच्या निधनामुळे या दोन्ही चिमुकल्यांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीर जवान वैभव आवताडे यांचे पार्थिव विशेष विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव मूळ गावी गणेशवाडी येथे नेण्यात येईल. गावातून शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे येत देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वैभव आवताडे यांचे बलिदान अतुलनीय असल्याची भावना व्यक्त होत आहे. अवघ्या ३१व्या वर्षी जवानाचा मृत्यू हा कुटुंबासाठी मोठा आणि कधीही न भरून निघणारा आघात आहे.

या दुःखद प्रसंगी शासन आणि समाजाने वीरपत्नी दिपाली आवताडे, त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हीच वीर जवान वैभव आवताडे यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande