
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणेकरांचा सार्वजनिक प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने पीएमपी प्रशासनाने शहरातील बसथांब्यांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर पहिल्या टप्प्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ६८५ बसथांबे आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येणार आहेत.
या आधुनिक बसथांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन, मोबाईल चार्जिंगसह विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच बसथांब्यांच्या छतावर सौरऊर्जा पॅनल बसविण्यात येणार असून, त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर थांब्यावरील दिव्यांसाठी केला जाणार आहे.
पहिल्यांदाच पीएमपी प्रशासनाकडून क्लस्टरनुसार आधुनिक बसथांबे उभारण्यात येत आहेत. पुण्यातील बसथांब्यांसाठी चार क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यामध्ये शहरातील वर्दळीचे आणि प्रवासी संख्या अधिक असलेले भाग निवडण्यात आले आहेत.
पहिल्या टप्प्यात पुण्यातील ३३९, तर पिंपरी-चिंचवडमधील ३४६ बसथांब्यांचा समावेश आहे. आधुनिक बसथांबे उभारण्यासाठी संबंधित ठेकेदाराला जागा १५ वर्षांसाठी देण्यात येणार आहे. त्याबदल्यात ठेकेदाराकडून बसथांब्यावर आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.
हे बसथांबे प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलच्या संरचनेत उभारण्यात येणार आहेत. एका बसथांब्यासाठी किमान चार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बसथांब्यांवर सौरऊर्जा पॅनल बसविल्यामुळे वीज बचतीसह पर्यावरणपूरक सुविधेलाही प्राधान्य मिळणार आहे.
पीएमपी प्रशासनाचा दरवर्षी किमान एक हजार आधुनिक बसथांबे उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने शहरातील जुन्या बसथांब्यांचे रूपांतर आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या थांब्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही आणि पॅनिक बटनामुळे प्रवाशांसह विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेला मदत होणार असून, मोबाईल चार्जिंगसारख्या सुविधांमुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु