
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
पुण्याचे नाव जगभर पोहोचविणाऱ्या पुणे फेस्टिव्हलची उंची भविष्यात आणखी वाढेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल अॅडव्हायजरी कमिटीचे चेअरमन चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला. अॅडव्हायजरी कमिटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुण्यातील कलावंतांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
हॉटेल प्राईड येथे आयोजित या मेळाव्याला पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुभाष सणस, सचिव व सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, बालगंधर्व कार्यक्रम प्रमुख व विश्वस्त मोहन टिल्लू यांच्यासह पुण्यातील अनेक नामवंत कलावंत, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, कवी आणि कार्यक्रम संयोजक उपस्थित होते.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पुणे फेस्टिव्हलची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अभिनेत्री व नृत्यांगना खासदार हेमा मालिनी या दीर्घकाळ या महोत्सवात आपला नृत्याविष्कार सादर करीत आहेत. अशा प्रकारचे वैशिष्ट्य अन्य कोणत्याही महोत्सवात पाहायला मिळत नाही. पुणे फेस्टिव्हलचा सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक करण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू.”
पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर पुण्यात आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच पुण्यातील प्रकाशझोतात न आलेली पर्यटन व सांस्कृतिक स्थळे शोधून ती नागरिक आणि पर्यटकांसाठी खुली करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये प्रकाशझोतात नसलेल्या ८४ स्थळांचा शोध घेऊन त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्याच धर्तीवर पुण्यातही उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु