पुणे जिल्ह्यात ८३ हजार शेतकऱ्यांनी उतरविला खरीप पीकविमा
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)। नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात यंदा ८३ हजार ३७ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. या माध्यमातून ३९ हजार ७०२ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले असून, या पिकांची एकूण विमा संर
pik veema


पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या जोखमीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात यंदा ८३ हजार ३७ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा उतरविला आहे. या माध्यमातून ३९ हजार ७०२ हेक्टर क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले असून, या पिकांची एकूण विमा संरक्षित रक्कम २३८ कोटी ७२ लाख ६ हजार रुपये आहे.

जिल्ह्यात खरीप पिकांखालील सरासरी क्षेत्र सुमारे २ लाख २५ हजार हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १८ टक्के क्षेत्र विम्याच्या कक्षेत आले आहे. यंदा पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांमध्ये १३ हजार १२९ कर्जदार, तर ६९ हजार ९०८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.सोयाबीन, कांदा, बाजरी आणि भात या प्रमुख खरीप पिकांसाठी विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे.पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांच्या संख्येत पुरंदर तालुका आघाडीवर आहे. पुरंदरमध्ये १५ हजार ७६६ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. त्याखालोखाल इंदापूरमध्ये १४ हजार ५५२, जुन्नरमध्ये ११ हजार ९२३ आणि खेडमध्ये १० हजार ९ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना होणारा आर्थिक फटका कमी करण्यासाठी पीकविम्याचे कवच उपयुक्त ठरते. यंदा बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा सहभाग दिसून येत असून, गावपातळीवरील जनजागृती आणि माहिती प्रसारामुळे अधिक शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचण्यास मदत झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande