
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.) जागतिक पातळीवरील अंतराळ संशोधन संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन विज्ञान-तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची संधी पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १०३ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पुणे जिल्हा परिषद आणि आयुका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निवड चाचणीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.या निवड प्रक्रियेत नासा अभ्यासदौऱ्यासाठी २५, युरोपीय अंतराळ संस्थेच्या (ईएसए) भेटीसाठी २५ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) भेटीसाठी ५० विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता आठवीतील तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांत निवड चाचणी घेण्यात आली. एकूण २५८ विद्यार्थ्यांमधून आयुकाच्या तज्ज्ञ समितीने ४, ५ आणि ६ ऑगस्ट २०२६ रोजी तिसऱ्या व अंतिम फेरीची परीक्षा घेतली.अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जगातील नामांकित अंतराळ संशोधन संस्थांना भेट देऊन तेथील संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनाबाबतची जिज्ञासा वाढण्यास मदत होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु