राहुल गांधी २२ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर; महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी साधणार संवाद
पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत असून, ‘छात्रों की गूंज’ या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा संवाद कार्
rahul gandhi


पुणे, 16 ऑगस्ट (हिं.स.)।

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत असून, ‘छात्रों की गूंज’ या विशेष उपक्रमांतर्गत ते महाविद्यालयीन विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. एसएसपीएमएस मैदानावर सायंकाळी ५ वाजता हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर, संध्या सव्वालाखे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. पुणे हे विद्येचे माहेरघर असून, नीट परीक्षेतील पेपरफुटीचे मुख्य केंद्र पुणे होते, असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी सरकारकडून लाठीचार्ज केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.राहुल गांधी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेणार असून, हे प्रश्न संसदेत मांडणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.भाजपवरही टीका करताना सपकाळ यांनी पक्षाकडे स्वतःचे नेतृत्व शिल्लक नसल्याचा आरोप केला. पैशांच्या जोरावर बाहेरून नेते आणून भाजप चालविला जात असल्याचे तसेच ईडीची भीती दाखवून पक्ष फोडण्याचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले.राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande