
सोलापूर, 16 ऑगस्ट (हिं.स.)।
नीरा उजवा कालव्याचे पाणी गेल्या महिनाभरापासून सुरू असून, माळशिरस तालुक्यातील विविध तलाव आणि बंधारे भरून घेण्यात येत आहेत. मात्र प्रकल्प अहवालात तरतूद असूनही पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके तलावात अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या नऊ गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने तलावात पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी तसेच वीर धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील माध्यम प्रकल्प असलेल्या तिसंगी सोनके तलावात पाणी सोडून तो भरून घेण्याची पद्धत आहे.
तिसंगी सोनके तलावावर सोनके, पळशी, उपरी, गादेगाव, भंडीशेगाव, वाखरी, शेळवे, कौठाळी आणि खेड भाळवणी या गावांतील नागरिक व शेतकरी अवलंबून आहेत. मात्र गेल्या महिनाभरापासून उभ्या पिकांसाठी कालव्यातून पाणी सोडले जात असल्याचे कारण देत तलावात पाणी सोडण्यास विलंब होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तिसंगी सोनके तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी दरवेळी संघर्ष करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तलावात पाणी सोडण्यासाठी यापूर्वीही आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
“तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी दरवेळी संघर्ष आणि आंदोलन करावे लागते. यंदाही तलावात पाणी सोडण्यास विलंब होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी दिगंबर वाघमारे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड