कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
डॉ. दिलीप फुगारे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण नांदेड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। “कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती…” या विचाराला आपल्या कार्यातून प्रत्यक्ष जीवनमूल्य देणारे संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीचे संस्थापक कर्मयोगी बाबा
अ


डॉ. दिलीप फुगारे यांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

नांदेड, १७ ऑगस्ट (हिं.स.)। “कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती…” या विचाराला आपल्या कार्यातून प्रत्यक्ष जीवनमूल्य देणारे संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळीचे संस्थापक कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त कृतज्ञ अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

बाबासाहेब देशमुख यांनी १९५९ मध्ये आपल्या १०० एकर जमिनीचे दान केले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या उपस्थितीत आणि तत्कालीन गावातील ज्येष्ठ आबाजी फुगारे यांच्या हस्ते त्यांनी वडाचे छोटेसे रोपटे लावले होते. आज त्या रोपट्याचे ६८ वर्षांचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले असून, त्याच्या सावलीत अनेक पिढ्यांनी शिक्षण घेतले, स्वतःचे आयुष्य घडवले आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत योगदान दिले.

शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, पाणलोट विकास आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांतून बाबासाहेबांनी पाहिलेल्या ग्रामीण विकासाच्या स्वप्नाचा प्रवास आजही अविरत सुरू आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, अनेकांच्या स्वप्नांना बळ मिळाले आणि ग्रामीण जीवनाला विकासाची नवी दिशा मिळाली.

याच कृतज्ञतेची साक्ष देत, आबाजी फुगारे यांचे नातू, अपेक्षा हॉस्पिटल, नांदेडचे संचालक तसेच सगरोळीचे माजी विद्यार्थी डॉ. दिलीप फुगारे यांच्या हस्ते कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

यावेळी सिडको, छत्रपती संभाजीनगरचे संचालक भुजंग गायकवाड तसेच नांदेड जिल्हा सत्र न्यायालयातील वकील ऍड. बाबू गावंडे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण केले.

“बाबासाहेबांनी आम्हाला केवळ शिक्षण दिले नाही, तर आयुष्य जगण्याची दिशा दिली,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

बाबासाहेब देशमुख आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याचा वारसा सगरोळीच्या सामाजिक आणि शैक्षणिक वाटचालीत आजही जिवंत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांत, शेतकऱ्यांच्या आशेत, कार्यकर्त्यांच्या ध्येयात आणि सगरोळीच्या मातीच्या कणाकणात त्यांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी ठरत आहेत.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande