
लातूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज, कायदा-सुव्यवस्था, सायबर सुरक्षा, व्यसनमुक्ती, वाहतूक नियम, महिला व बालकांचे संरक्षण तसेच सुरक्षिततेच्या विविध बाबींची माहिती मिळावी आणि पोलीस-विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला लातूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व २३ पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदार नियमितपणे शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. पोलीस अधिकारी थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत असल्याने या भेटींमध्ये उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग पाहायला मिळत आहे.
स्वतः पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दयानंद कला महाविद्यालय तसेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, लातूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
लातूर शहर उपविभागातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोददार इंटरनॅशनल स्कूल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
चाकूर उपविभागातील चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कै. जनार्धन राजमाने उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपविभागीय पोलीस अधिकारी मायने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनमथ स्वामी उच्च माध्यमिक विद्यालयात परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अक्षय जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
निलंगा उपविभागातील औराद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरभद्र आर्य विद्यालय, औराद शहाजनी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल डुमे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अहमदपूर उपविभागातील किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी रायबोले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून विविध विषयांची माहिती दिली.
‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांना १०९ भेटी देण्यात आल्या असून, तब्बल ३१ हजार ४५९ विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ पोलिसांच्या कामकाजाची माहिती न देता कायदेविषयक जागरूकता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, व्यसनांपासून दूर राहण्याची जाणीव, वाहतूक शिस्त, महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत संवेदनशीलता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे.
विद्यार्थी हे समाजाचे भविष्य असल्याने त्यांच्याशी थेट संवाद साधून त्यांना कायद्याची माहिती आणि सुरक्षिततेचे भान देणे, तसेच पोलीस आणि विद्यार्थी यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, हा ‘पोलीस-विद्यार्थी संवाद’ उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षितता, कायदेविषयक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
----------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis