
लातूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
नशामुक्त भारत अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी
नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त लातूर जिल्ह्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या किमान 10 टक्के नागरिकांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजात ‘सामूहिक प्रतिकारशक्ती’ निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व अनुदानित वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच अभियानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे.
LED स्क्रीन, सोशल मीडिया आणि पोस्टर्सद्वारे जनजागृती
राष्ट्र उभारणीच्या या महत्त्वपूर्ण अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी कार्यालय परिसरातील Smart City LED Display Screens, सोशल मीडिया, पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून नशामुक्ती अभियानाचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘नशामुक्ती मित्र’ म्हणून नोंदणीचे आवाहन
कर्मचारी आणि नागरिकांनी ‘नशामुक्ती मित्र’ म्हणून नोंदणी करून अभियानात सहभागी व्हावे. तसेच केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरून e-Pledge घेऊन अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे.
व्यसनमुक्तीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांक 14446 चा देखील व्यापक प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis