
वर्धा, 17 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) वर्धा कार्यालयाची इमारत, संदर्भ सेवा केंद्र तसेच हॅनसन्स सभागृहाच्या बांधकामासाठी ११ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नांमुळे हा निधी उपलब्ध झाला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. प्रस्तावित बांधकामाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाने तयार केले असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत झाल्याने नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः कुष्ठरोग संदर्भ सेवा केंद्र आणि संबंधित कार्यालयासाठी स्वतंत्र व आवश्यक सुविधा निर्माण होणे हे आरोग्य प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. शासन निर्णयानुसार प्रस्तावित बांधकामासाठी ११ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाचा खर्च राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित तरतुदीतून करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समतोल ठेवत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तळेगाव येथे ३०० खाटांचे व हिंगणघाट येथे ४०० खाटांचे रुग्णालयाचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. सोबतच नवीन मेडिकल कॉलेजदेखील मंजूर करण्यात आले आहे. आंजी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. नागरिकांना चांगल्या व दर्जदार आरोग्य सुविधा देण्यावर सरकारचा भर आहे. असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी