
- ‘पीक संजीवनी-समृद्ध बळीराजा’ पुस्तकाचे प्रकाशन
परभणी, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
रासायनिक घटकांचा अतिरेकी वापर टाळून जमिनीचे आरोग्य जपणे, उत्पादनाची गुणवत्ता वाढविणे आणि विषमुक्त शेतीकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मार्ग स्विकारावा, असे आवाहन डॉ. दिलीप उदासी यांनी केले.
जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील शारदा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक मेळावा, शेतकरी मेळावा आणि विद्यार्थी सन्मान कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. याप्रसंगी डॉ. दिलीप उदासी यांच्या ‘पीक संजीवनी-समृद्ध बळीराजा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. उदासी यांनी उपस्थित शेतकर्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री मधुकर शिक्षण प्रसारक मंडळ, गडदगव्हाणवाडीचे अध्यक्ष श्रीरंगराव लक्ष्मणराव राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न, कृषितज्ज्ञ व शेतकरी मित्र डॉ. दिलीप उदासी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन, देशभक्ती आणि राष्ट्रनिर्मिती या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले. संजय राठोड यांनी आपल्या मनोगतातून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वातंत्र्याच्या गौरवशाली परंपरेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेवून विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रांतील कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे माध्यम उपलब्ध करून देणारा पालक मेळावाही यावेळी घेण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis