
वाढीव जलउपसा प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना
सोलापूर, १७ ऑगस्ट (हिं.स.) : अक्कलकोट शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणा तसेच वाढीव पाणीपुरवठा व्यवस्थेच्या कामांची पाहणी करण्यात आली. इंटेक ते जॅकवेलदरम्यान सुरू असलेल्या नवीन मोठ्या व्यासाच्या पाइपलाइनच्या कामाचा आढावा घेऊन संबंधितांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कुरनूर धरणाला भेट देऊन जलउपसा यंत्रणेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर अक्कलकोट येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली.
वाढीव यंत्रणेची कामे प्रलंबित ठेवू नयेत तसेच उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून ही यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशा सूचना संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या.
वाढीव जलउपसा आणि जलशुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर अक्कलकोट शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना कमी कालावधीत आणि अधिक सुरळीत पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
अक्कलकोट शहरातील नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
पाहणीवेळी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेते यशवंत धोंगडे, पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी, पाणीपुरवठा अभियंता मनोज ईश्वरकट्टी आदी उपस्थित होते.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड