
पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वागतार्ह : सुनील केदार
नाशिक, 17 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक कुंभनगरीचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी, नाशिक महानगर जिल्ह्याच्या वतीने वसंत स्मृती, भाजपा कार्यालय येथे ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनासह नाशिकच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार, महापौर हिमगौरी आडके आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वागतार्ह : सुनील केदार
यावेळी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार म्हणाले, “नाशिकच्या पालकमंत्रिपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची निवड स्वागतार्ह आहे. मागील कुंभमेळ्याच्या काळातही गिरीश महाजन पालकमंत्री होते. त्यावेळी पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत पूर्ण वेळ काम केले होते. त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्यांचा अनुभव निश्चितच उपयुक्त ठरेल.”
“येत्या कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिककरांच्या सहकार्याने सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने रामकाल पथासह विविध विकासकामांसाठी ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. आवश्यकता भासल्यास आणखी निधी देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे नाशिकचा आगामी कुंभमेळा भव्य-दिव्य, यशस्वी आणि निर्विघ्नपणे पार पडेल,” असा विश्वास सुनील केदार यांनी व्यक्त केला.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्याच्या तयारीला अधिक वेग मिळून नाशिकच्या पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI