काँग्रेसच्या निषेधार्थ कोल्हापूरात भाजयुमोची निदर्शने
कोल्हापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा भवन (काँग्रेस मुख्यालय) येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर
भाजयुमोची कोल्हापुरात काँग्रेसविरोधात निदर्शने


कोल्हापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली येथील इंदिरा भवन (काँग्रेस मुख्यालय) येथे झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणावरून निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने कोल्हापुरात काँग्रेसविरोधात निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करून काँग्रेसच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.

यावेळी प्रस्ताविकात भाजयुमोचे भूषण कानकेकर म्हणाले, “१५ ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी राष्ट्रभक्ती, अभिमान आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याचा पवित्र दिवस आहे. देशभरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला. अशा दिवशी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणाबाबत निर्माण झालेला वाद अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेमुळे काँग्रेस नेतृत्वाच्या राष्ट्रभावनेबाबत प्रश्न निर्माण होत असून, भाजयुमो या प्रकाराचा तीव्र निषेध करीत आहे.”

यावेळी भाजयुमोचे सरचिटणीस वल्लभ देसाई म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या त्यागातून आणि राष्ट्रभक्तीतून ‘वंदे मातरम्’ हे गीत स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान बनले. या पवित्र गीताचा कोणत्याही प्रकारे अनादर होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. राष्ट्रीय प्रतीकांबाबत कोणत्याही प्रकारचा अनादर खपवून घेतला जाणार नाही.”

“वंदे मातरम्’च्या घोषणेने स्वातंत्र्यलढ्यातील लाखो देशभक्तांना प्रेरणा दिली. त्यामुळे या गीताबाबत झालेली घटना ही केवळ एका गीतापुरती मर्यादित नसून, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आणि राष्ट्रभावनेचा अवमान करणारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले. भाजयुमोच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रीय भावना आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित प्रतीकांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande