
नांदेड, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
संस्कृति संवर्धन मंडळ संस्थेच्या नवीन इनडोअर हॉल ऑलिम्पिया स्पोर्ट्स एरिना, सगरोळी येथे कर्मयोगी बाबासाहेब देशमुख स्मृती चषक राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. संस्थेच्या एकलव्य क्रीडा अकादमी यांनी याचे यशस्वी आयोजन केले.
राज्यभरातून आलेल्या २२ संघांनी प्रो-कबड्डीच्या नियमांनुसार नेटवर खेळलेल्या या स्पर्धेत प्रत्येक सामना रोमांचक ठरला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतींनी क्रीडाप्रेमींच्या श्वासाचा ठाव घेतला!
विजेता — बिलोली संघ
उपविजेता — अहमदपूर संघ
तृतीय क्रमांक — निझामाबाद संघ
स्पर्धेचे उद्घाटन सगरोळी येथील प्रतिष्ठित श्री. मारोती कुरुडगे यांच्या हस्ते, तर बक्षीस वितरण संस्थेचे संचालक मा. रोहितजी देशमुख यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रीय पंचांचे अचूक मार्गदर्शन, वैद्यकीय विभाग बिलोली व पोलीस स्टेशन बिलोलीचे सहकार्य आणि आयोजकांच्या अथक प्रयत्नांतून स्पर्धेला विशेष रंगत आली.
सगरोळीतील शेकडो क्रीडाप्रेमींनी केवळ कबड्डी पाहिली नाही, तर अनुभवली !
संस्थेचा मातीच्या मैदानापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर एरिनापर्यंतचा हा प्रवास, ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला नवी ओळख देणारा ठरला.
क्रीडा संयोजक नंदकिशोर जाधव यांनी संस्थेच्या वतीने सहभागी संघ, पंच, व्यवस्थापन आणि प्रेक्षकाचे आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis