आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
नियमित तपासणीसह सीसीटीव्ही, स्वच्छता आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश चंद्रपूर, 17 ऑगस्ट (हिं.स.) : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, सर्व जिल्ह्यांना आवश्यक खबरदारीच्या उपाययोजन
आश्रमशाळांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


नियमित तपासणीसह सीसीटीव्ही, स्वच्छता आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश

चंद्रपूर, 17 ऑगस्ट (हिं.स.) : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, सर्व जिल्ह्यांना आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची नियमित तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ज्या गावांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच व्हीजेएनटीच्या शासकीय अथवा अनुदानित आश्रमशाळा आहेत, त्या ठिकाणी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलिस पाटील यांनी नियमित भेटी द्याव्यात. तसेच आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापक यांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

आपत्कालीन परिस्थितीसाठी संपर्क यंत्रणा

आश्रमशाळेत कोणतीही अनुचित घटना घडल्यास विद्यार्थ्यांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असावेत. त्याचप्रमाणे महसूल यंत्रणेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांकही आश्रमशाळेत दर्शनी ठिकाणी उपलब्ध करून ठेवावेत, असे निर्देश देण्यात आले.

साप-विंचवांपासून सुरक्षेसाठी खबरदारी

आश्रमशाळेच्या परिसरातील वाढलेले गवत आणि झुडपे नियमितपणे काढण्यात यावीत. परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवून साप, विंचू आदींपासून विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

झाडे व झुडपे असलेल्या भागात तसेच संरक्षण भिंतीलगत थिमेटचा वापर करावा आणि त्याची दिनांकनिहाय नोंद ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

वर्गखोल्यांमध्येही सुरक्षा उपाय

वर्गखोल्या तसेच विद्यार्थी राहत असलेल्या खोल्यांच्या दरवाजांच्या खाली रबर स्टिक बसवून घ्याव्यात. यासोबतच आश्रमशाळेच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश वसुमना पंत यांनी दिले.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार बैठकीत सहभागी झाले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande